दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती नवी नाही. मात्र या गळतीवर नजर टाकली तर शरद पवारांशी सुरुवातीपासून एकनिष्ठ असलेले आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज घराणीच शरद पवारांची साथ सोडताना दिसत आहेत. यामुळे शरद पवार एकाकी पडल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे. शरद पवारांच्या आयुष्यात इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक आमदार आणि नेते राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची साथ सोडून भाजपाच्या आणि शिवसेनेच्या गोटात जात आहेत. यामुळे शरद पवार एकाकी पडल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात आहे. 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून त्यांच्याबरोबर असलेल्या राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज घराण्यांनी आज पवारांची साथ सोडली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर याची सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना सोडून सोलापूरचे मोहिते-पाटील घराणे भाजपाच्या गोटात सामिल झाले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यात भर पडत आहे. आतापर्यंत पवारांची साथ सोडून गेलेल्या दिग्गज राजकीय घराण्यांमध्ये सोलापूरचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील, हातकणंगलेच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचा मुलगा धैर्यशील माने, बीडचे जयदत्त क्षीरसागर, नगरचे मधुकरराव पिचड आणि त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड, सातारचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंह राजे भोसले हे सुरुवातीपासून शरद पवारांबरोबर होते. 


यवतमाळचे मनोहर नाईक यांचा मुलगा इंद्रनील नाईक, सोलापूरचे दिलीप सोपलतर यापूर्वी विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, सुरेश धस, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, संजय सावकारे, लक्ष्मण ढोबळे किसन कथोरे, दीपक केसरकर, उदय सामंत, राहुल कूल यांनी पवारांची आणि राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. तर नवी मुंबईतील गणेश नाईक घराणेही राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहे.


एवढ्या मोठ्या संख्येत नेत्यांनी पवारांची साथ सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शरद पवारांना राजकारणात असा मोठा फटका बसला होता. त्याची आठवण सांगत पक्ष पुन्हा यातून सावरेल असा आत्मविश्वास पवारांनी व्यक्त केलाय. सर्व मार्गांचा अवलंब करून भाजपा आमचे नेते खेचण्याचा प्रयत्न करतंय मात्र राज्याच जेव्हा जेव्हा पक्ष बदलण्याचं काम झालं, तेव्हा तेव्हा जनतेनं त्यांना धडा शिकवला, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पक्षांतरावर बोलताना केलाय.


शरद पवार यांनीही यापूर्वी असं फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. 1999 साली काँग्रेस सोडल्यानंतर पवारांनी रज्यात काँग्रेसला मोठे खिंडार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.


1999 पासून 2014 अशी सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. तेव्हा राज्यातील दिग्गज राजकीय घराणी शरद पवारांबरोबर होती. मागील पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. आता पुन्हा सत्ता येणार नाही म्हणून अस्वस्थ असलेले अनेक जण पक्षांतर करतायत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या अडचणीत आला आहे.