मराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका
मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Chagan Bhujbal Resignation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी पुन्हा एकदा सरकारवरच निशाणा साधला.एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचे काम सुरू आहेत. 54 लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का? असा सवाल विचारत ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय...तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा भुजबळांनी सरकारला दिला आहे. भुजबळ यांनी जाहीरपणे केलेल्या विरोधानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु जाली आहे. यावर राष्ट्रवादीने भूमिका जाहीर केली आहे.
भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावं
भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. अन्यथा त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं समजावं असा आरोप त्यांनी केला. तर आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचं नसल्याचा दावा भुजबळांनी केलाय.
छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया
ओबीसी आरक्षण अबाधित रहावे यासाठी भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर सरकार मधून बाहेर पडण्याचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. पण भुजबळ यांच्या राजिनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
भुजबळ हे जेष्ठ नेते आहे. मंडल आयोगाच्या अंमल बजावणीपासून या चळवळीत ते काम करत आले आहेत. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सरकार आणि भुजबळ यांची भूमिका आहे. यामध्ये काही समज गैरसमज झाले असतील तर चर्चे अंती दुर केले जातील असे देखील सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
भुजबळांनी मराठा आरक्षणावरुन सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते. मात्र, मंत्रीच विरोधात बोलत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडली. तसं तसं होत नाही याचा अर्थ त्यांची मिलीभगत असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. तर, मिलीभगत अजिबात नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ एकाकी पडले?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत मंत्री छगन भुजबळ एकाकी पडत असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंनीही मराठा आरक्षणाचं समर्थन केलंय.. मराठा आरक्षणाचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न महायुतीच्या काळात मार्गी लागल्याबद्दल तटकरेंनी समाधान व्यक्त केलंय. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून, पक्षाची नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय..त्याला उत्तर देताना भुजबळांनी ही भूमिका आपलीच असल्याचं ठणकावून सांगितलंय. ही भूमिका माझीच आहे. कोणाला पटो ना पटो ओबीसींसाठी लढतोय आणि लढत राहणार असं स्पष्ट शब्दात भुजबळांनी ठणकावल आहे.