मुंबई, पुणे : केरळच्या महापुरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र याच पुराच्या पार्श्वभूमीवर अशीच परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय. निसर्गाला आव्हान दिलं की काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे केरळमध्ये आलेला महापूर आहे. आतापर्यंत शेकडो बळी गेले, हजारो लोक बेघर झाले. या सगळ्याला जबाबदार आहे ते म्हणजे केरळमध्ये झालेली बेसुमार वृक्षतोड, डोंगरांचं उत्खनन, सपाटीकरण, नियमांना फासलेला हरताळ,भातशेतीवरील अतिक्रमण, बेसुमार बांधकाम,नदीतला वाळू उपसा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईत नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आज संपुष्टात आलेत. मुंबईतल्या नद्या गटारगंगा झाल्यात. पाणी झिरपायला मुंबईत मातीच शिल्लक राहिलेली नाही. सिमेंट काँक्रेटचं जंगल मुंबईत उभं राहिलंय.  डोंगरावर अतिक्रमणाचा विळखा आहेच त्याचसोबत हे डोंगर पोखरलेही जातातय. कोकणात ही बेसुमार वृक्षतोड आहे. त्यामुळेच येणारा काळ भयावह असण्याची शक्यता आहे. 



मुंबईला २००५ साली पुराचा जबरदस्त तडाखा बसलाय. शिवाय थोड्या पावसातच मुंबई जलमय होते. नुकतंच मुंबईला लागून असलेल्या वसई विरारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निसर्गावर मात करण्याची ही वृत्ती घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे. अन्यथा मुंबई आणि कोकणचाही केरळ होऊ शकतो.