अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज होळीचा सण सर्वत्र साधेपणाने साजरा केला जातोय. राज्यावरील कोरोनाचे वाढते संकट पाहता सरकारने नियम अधिक कठोर केले आहेत. आणि जनतेलाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलंय. पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना या नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसतंय. कोरोना काळात हे दोघेही विनामास्क सार्वजनिक ठिकाणी खेळताना दिसतायत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राणा दाम्पत्य आदिवासी बांधवासोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेले होते. तिथे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षापासून ची परंपरा जोपासली. आज मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून खासदार नवनीत राणा यांनी मनसोक्त आनंद लुटला. मात्र यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. 



दोघांनीही तोंडाला मास्क बांधले नव्हते. तसेच सोशल डिस्टनचे यावेळी तीन तेरा वाजले होते. यावेळी नवनीत राणा यांच्या चेंडूवर आमदार रवी राणा यांनी बॅटींग केली. तर नवनीत राणा यांनीसुद्धा क्रिकेट पीचवर जोरदार बॅटींग केली.



राणा दाम्पत्याने यावेळी तुफान बॅटींग करत क्रिकेटचा आनंद लुटला. जिल्हात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना राणा दाम्पत्याने सोशल डिस्टन्सिंगचे फज्जा उडवल्याचे दिसतंय. दोघांच्या तोंडाला मास्क नव्हता. त्यामुळे कोरोना नियम केवळ सर्वसामान्य माणसालाच का ? हा प्रश्न पुन्हा यानिमित्ताने उपस्थित होत आहे.