CM Shinde On Navi Mumbai Airport: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) कामाची हवाई पहाणी केली. या पहाणीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या विमानाचं उड्डाण कधी होणार यासंदर्भातील माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच या विमानतळाचं उद्घाटन व्हावं यासाठी युद्धपातळीवर विमानतळाचं काम पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.


कामाबद्दल सामाधानी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी समाधान व्यक्त केलं. "अतिशय चांगलं आणि वेगाने काम सुरु आहे. अनेक आव्हानं या कामामध्ये होती. त्यामध्ये नदी असेल, रॉक कटिंग असेल यासारखी अनेक आव्हानं होती. सुरुवातीला अतिशय कठीण वाटणारा हा प्रकल्प आजच्या पहाणीनंतर लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच सामान्यांसाठी हा प्रकल्प सुरु होईल अशी परिस्थिती आता पहायला मिळत आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. मागील पहाणीपेक्षा यंदा बरंच काम झाल्याचं दिसत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. "आम्ही हवाई पहाणी देखील केली. पुर्वीची परिस्थिती डोंगर दिसत होते. आज मोठ्या प्रमाणात सपाटीकरण झालं आहे. काही रॉक कटिंग राहिलं आहे ते पण लवकरच होईल," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


9 कोटी प्रवासी वापरणार हे विमानतळ


तसेच या विमानतळाशी संलग्न अनेक वाहतूक व्यवस्था असतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. "या विमानतळामुळे मुंबईवर असलेला भार या विमानतळामुळे खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा देशातील युनिक प्रकल्प ठरेल. ठाणे, मुंबई, पुणे, एनएच-4 या सर्वांना जोडणार हा मल्टी मॉडल प्रकल्प आहे. यामध्ये मेट्रो, सबअर्बन रेल्वे, वॉटर ट्रान्सपोर्टसारख्या वाहतूक सुविधा आहेत. हे सर्व एकत्र येऊन या विमानतळाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. 9 कोटी प्रवासी दरवर्षी या विमानतळाचा वापर करतील. मुंबई एमएमआर आणि आजूबाजूच्या शहरांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा देणार आहे," असं शिंदेंनी सांगितलं.


अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करणार


"या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या आहेत. या प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे. इतर परवानग्याही पटापट मिळतील. हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार 11 महिन्यांपूर्वी स्थापन झाल्यानंतर जे प्रकल्प देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 मध्ये सुरु झाले ते नंतरच्या काळात मंदावले किंवा काही अडचणी आल्या त्या दूर करण्यात आल्या. यामध्ये समृद्धी, मेट्रो, मुंबई-पुणे मिसिंग लिंक यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई-पुणे प्रवास अर्ध्यातासाने कमी होईल. हे सर्व प्रकल्प वॉर रुममध्ये घेतले आहेत. हे सर्व प्रकल्प वेळेपूर्वी लोकार्पण करण्याचा मानस आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.



मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी...


नवी मुंबई विमानतळासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदेंनी, "लोकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं विमानतळ आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं. जसं नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झालं. त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तशाच प्रकारचा हा महत्त्वकांशी प्रकल्प असून आमची अपेक्षा असीच आहे याचं देखील उद्घाटन देखील आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं पाहिजे. यासाठी या प्रकल्पामधील काही अडचणी असतील तर त्या युद्धपातळीवर दूर करण्यासाठी आज पहाणी दौरा केला," असं सांगितलं.


पहिल्या विमानाचं उड्डाण कधी होणार?


मुख्यमंत्र्यांना पहिल्या विमानाचं उड्डाण कधी होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, "त्यांनी तारीख दिली आहे डिसेंबर 2024. पण आम्ही त्यांना सांगितलं आहे. मार्च, एप्रिल किंवा मे पर्यंत तरी उड्डाण झालं पाहिजे. यासाठी पूर्ण सहकार्य राज्य सरकार त्यांना देईल," असं उत्तर दिलं.