गणेश नाईक यांचा ११ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का लागणार आहे.
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे ११ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु होती. या अगोदरच संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता गणेश नाईक ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपा प्रवेश करतील. यावेळी माजी खासदार संजीव नाईकदेखील भाजपचं कमळ हातात घेतील.
१५ वर्ष गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. शहरी आणि ग्रामिण भागात गणेश नाईक यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. ठाण्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपला मोठा नेता यामुळे मिळणार आहे, असं बोललं जात आहे.
गणेश नाईक यांच्यासोबत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगरसेवक, ठाणे, पालघर, रायगडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपमध्ये जाणार आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक हे वेगळा गट स्थापन करतील, यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत भाजपचे फक्त ६ नगरसेवक आहेत. आता ५५ नगरसेवक त्यांना जोडले जाणार आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात येणार आहे.