Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 मे रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (51) याला उदयपूर येथून अटक करण्यात आली होती. तसेच हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचेही समोर आलं होतं. आता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 


अनधिकृत होर्डिंग असलेल्या कंपन्यांना नोटीस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच महापालिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी मुंबई महापालिकेने गेल्या तीन दिवसात शहरातील 31 अनधिकृत होर्डिंग हटवले आहेत. तसेच जवळपास 300 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग असलेल्या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 


नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी राहुल देटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार गेल्या तीन दिवसात 31 अनधिकृत तसेच नियमानुसार नसलेले होर्डिंग हटवले आहेत. यात रेल्वे लाईन, महामार्ग, रस्ते या ठिकाणच्या होर्डिंगचा समावेश आहे. 


वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून रात्री कारवाई


नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे. यात 200 कर्मचारी आणि विभाग अधिकारी कार्यरत आहेत. तसेच आतापर्यंत नवी मुंबईतील जवळपास 300 अनधिकृत होर्डिंगला नोटीस बजावण्यात आली आहे. हे सर्व होर्डिंग लवकरात लवकर उतरवण्यात येणार आहे. वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी हे होर्डिंग उतरवण्याचे काम रात्री करण्यात येईल, असेही राहुल देटे यांनी सांगितले.


भावेश भिंडेला अटक


दरम्यान मुंबईत गेल्या सोमवारी (13 मे) घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. मुंबईत घाटकोपर परिसरात 120 फुटांचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. सोसायट्याचा वारा आणि अचानक सुरु झालेला पाऊस यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपखाली आश्रय घेतला होता. मात्र त्यावेळी हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 75 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असल्याची माहिती समोर आली होती. 


यानंतर इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक भावेश भिंडे आपल्या कार चालकासह फरार झाला होता. यानंतर तीन दिवसांनी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी अटक केली. राजस्थानच्या उदयपूरमधून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.