Navi Mumbai Crime News: ​ उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोडलगत दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरुन तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे. 


नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोड लगतच्या झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. या महिलेची हत्या केल्याचे तपासाता समोर आले होते. यानंतर उरण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी पोलिसांनी मृत महिलेचे फोटो व्हॉटस्अॅपवरुन व्हायरल केले होते. 


यादरम्यान मानखुर्द पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उरण पोलिसांनी बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांना चिरनेर येथे सापडलेल्या महिलेचा मृतदेह दाखवण्यात आला. त्यावेळी मृत महिलेच्या अंगावरील कपडे, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू तसेच हातावर गोंदलेले नाव यावरुन ही महिला पूनम चंद्रकांत क्षीरसागर (27) असल्याचे निष्पन्न झाले. 


इतरांसोबत संबंध असल्याच्या संशयामुळे हत्या


यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने पूनमबाबत माहिती जमवण्याचा प्राप्त करण्यास सुरुवात केली. पूनम हिचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेमसंबंध होते. ती 18 एप्रिलला कामावर गेली होती. त्यावेळी तिला टॅक्सी चालक निजामुद्दीन अली हा घेऊन गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पूनमचे इतरांसोबत संबंध असल्याची माहिती निजामुद्दीन अली याला मिळाली होती. त्यामुळे त्याने पूनमला 18 एप्रिलला फिरायला नेण्याच्या बहाण्याने टॅक्सीमधून कल्याण खडवली येथे नेले होते. त्याठिकाणी निजामुद्दीन अली याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पळ काढला होता.


त्यानंतर पोलिसांनी निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मृत पूनमबद्दल चौकशी केली असता, त्याने पुनमची हत्या करुन तिचा मृतदेह चिरनेर येथे टाकून दिल्याचे कबूल केले. त्यानुसार 27 एप्रिलला आरोपी निजामुद्दीन अली याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. त्याला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.