अमर काणे, झी मीडिया, नागपूर : हनुमान चालीसा पठण आणि महाआरती यावरून राणा दाम्पत्य आणि शिवसेना (ShivSena) यांच्यातील वादाचा पहिला अंक राज्याची राजधानी मुंबईत घडला. त्यानंतर आता या प्रकरणाचा दुसरा अंक राज्याच्या उपराजधानीत रंगणार आहे. राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नागपूरमध्ये आमने-सामने येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान चालीसा पठण आणि जेलवारी यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे प्रथमच 28 तारखेला विदर्भात येणार आहेत. नागपुरातील रामनगर इथल्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करणार आहेत. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याच हनुमान मंदिर परिसरात महागाई विरोधात आंदोलन होणार आहे.


या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठाण ही करणार आहेत. त्यामुळे युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामनगर इथल्या हनुमान मंदिरासमोर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 


राणा दाम्पत्याचं भव्य स्वागत
त्याआधी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर राणा दाम्पत्याचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी स्वागताला विदर्भातील कार्यकर्ते पोहचणार आहेत. नागपूर विमानतळावरील दुपारी 1 वाजता होणाऱ्या या भव्य स्वागतानंतर रॅली काढण्यात येणार आहे. नागपूर शहरातील विविध भागातून ही रॅली रामनगर येथील हनुमान मंदिरा पर्यंत पोहोचणार आहे.


रामनगर इथल्या हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि महाआरती होईल. तसंच हनुमान चालीसा पुस्तिकेचं वाटप करण्यात येईल. हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करताना युवा स्वाभिमानीने पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. नागपुरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती झाल्यावर राणा दाम्पत्य अमरावतीकडे रवाना होतील.


अमरावती जिल्ह्यात तिवसा इथं दुपारी 4 वाजता त्यांचं भव्य स्वागत होईल तर रात्री 9 वाजता अमरावती येथील दसरा मैदान हनुमान मंदिरा येथे पुन्हा राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करणार आहेत. या सर्व रॅली दरम्यान राणा दाम्पत्य 1 लाख हनुमान चालीसा पुस्तिकेचं वाटप करणार आहेत.