Navneet Rana यांच्या जीवाला धोका, Y प्लस सुरक्षा असणाऱ्या राज्यातल्या एकमेव खासदार
Y Plus security to Navneet Rana : नवनीत राणां यांना आजपासून Y प्लस सुरक्षा मिळाली आहे.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. नवनीत राणा यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी खासदार राणा (Navneet Rana) यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. आजपासूनच त्यांना हे वाय प्लस सुरक्षा कवच मिळणार आहे. अशी सुरक्षा असणाऱ्या नवनीत राणा राज्यातील एकमेव खासदार आहेत.
नवनीत राणांना (Navneet Rana get Y Plus security) आजपासून वाय प्लस सुरक्षा मिळाली आहे. त्यांच्या सुरक्षेत बंदुकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत.
राज्यातील महाविकासआघाडी सरकारला घेरणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. त्यांच्या सुरक्षेत आता एसपीओ, एनएसजीचे कमांडो असणार आहेत. सीएसएफचे जवान, शासकीय पायलट कार आणि दोन स्कॉर्पिओ गाड्या असा ताफा त्यांना मिळणार आहे.
अमरावतीतील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या विषयावरून स्थानिक पोलीस आणि नवनीत राणा यांच्यातील वाद विकोपाल गेला होता. त्यांनी याबाबत लोकसभेत हक्कभंग प्रस्तावदेखील आणला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त, अमरावतीचे आयुक्त, डीसीपी अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून अपशब्द वापरले, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.