Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  (MP Navneet Rana) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नवनीत राणा यांचा अर्ज फेटाळण्यात आलाय. जात प्रमाणपत्र प्रकरणी (caste certificate case) विशेष न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना मोठा झटका दिला आहे. राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्याचबरोबर  न्यायालयाने शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरही स्थगिती देण्यासही नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने आता खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. याबाबतचे आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिलेत. जात प्रमाणपत्राच्या प्रकरणावरुन  (caste certificate case) नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात दोनदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले.   


अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती निवडणूक जागा


राणा या अमरावतीतून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. राणा या जातीतील नसूनही त्यांनी त्या जातीचा दाखला मिळवत निवडणूक लढवली आणि ती जिंकली. मात्र, त्यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे आपले जात प्रमाणपत्र मिळवले. ही एक फसवणूक असून आहे. ही फसवणूक केल्याप्रकरणी राणा आणि त्यांच्या वडिलांवर मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, राणा यांनी जातीचा दाखला प्रकरणात दोषमुक्तीसाठी महानगरदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. मात्र, दंडाधिकारींनी त्यांचा अर्ज फेटाळला होता. यानंतर नवनीत राणा यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दंडाधिकारींचा निर्णय योग्य ठरवत अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता राणा यांना कधीही अटक होऊ शकते.


काय आहे हे प्रकरण, कोणी तक्रार दाखल केली?


लोकसभा निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जात बोगस प्रमाणपत्र ( caste certificate) दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने  जून 2021मध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.


दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा नवनीत राणा यांनी दिला होता. त्यानंतर नवीन राणा या देशभरात चर्चेत आल्या. पोलिसांनी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक केली होती. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.