समीर वानखेडे यांच्या धर्मांतराच्या आरोपावर ठाम, नवाब मलिक यांनी दिलं आव्हान
समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी वानखेडेंना आव्हान दिलं आहे
मुंबई : मुंबई ड्रग्स केस (Mumbai Drug Bust Case) प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक आरोप केला. समीर वानखेडे यांनी जातीचा बोगस दाखला (Fake Caste Certificate) काढून आयएसआरची नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला. जन्मदाखल्यावर खाडाखोड केल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडेंनी फेटाळले आरोप
समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळात या प्रकाराला आपण आव्हान देणार असल्याचं म्हटल आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला जन्म दाखला खोटा असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केल्यानंतर वानखेडे कुटुंबियांनी स्पष्टीकरण दिलं होतं. कुटुंबात कोणीही धर्मातर केलं नाही. पूर्वी पासून आम्ही हिंदू असल्याचा दावा वानखेडे कुटुंबियांनी केला आहे.
आपल्या वक्तव्यावर मलिक ठाम
पण आपल्या धर्मातराच्या आरोपावर नवाब मलिक अजून ठाम आहेत. समीर वानखेडे यांच्या काकाकडे दाखला आहे. त्या दाखल्यावर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नोकरी मिळवली. नोकरीत असतांना त्यांनी धर्मांतर करून नाव बदलून लग्न केलं. मी दाखवलेलं जन्म प्रमाणपत्र खोट आहे तर खरं प्रमाणपत्र दाखवा असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे.
समीर वानखेडे यांना आव्हान
जुना दाखला आम्ही मागत नाही, निकाहनामा दाखवा, दोन्ही मुलांचे जन्म प्रमाणपत्र दाखवा, दोन्ही मुलांचे शाळा - महाविद्यालयीन कागदपत्रे दाखवा, त्यांचे जातीचे दाखले दाखवा असं आव्हान मलिक यांनी दिलं आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या बहीनीने पण मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असून याचे पुरावे आपल्याजवळ असल्याचे मलिक म्हणाले. त्यांनी जो खोटा दाखला काढला ते लवकर सिद्ध होईल असं मलिक म्हणाले आहेत.