गडचिरोली: गडचिरोलीमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून मतदान पथकावर हल्ला करण्यात आला. येथील तुमरिकासा गावातील मतदान केंद्रानजीक हा प्रकार घडला. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोलीमधील मतदानप्रक्रिया ३ वाजता संपली. यानंतर मतदान पथकातील कर्मचारी ईव्हीएम यंत्रे आणि इतर साहित्ये घेऊन हेलिकॉप्टरच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. या गोळीबारात मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सी-६० पथकातील तीन कमांडो जखमी झाले. मात्र, उर्वरित कमांडोंनी नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावला. यावेळी नक्षलवाद्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेनेही गोळीबार केला. मात्र, यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. तर जखमी कमांडोना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. तत्पूर्वी आज सकाळीही गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मतदान पार पडले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. कालच गडचिरोलीच्या जांभीया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तर मंगळवारी दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भाजप नेते भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये भीमा मंडावी आणि पाच पोलीस जवानांचा मृत्यू झाला होता.