आशीष अम्बाडे, झी 24 तास, गडचिरोली : गडचिरोलीत नक्षल्यांनी नक्षल कमांडर रामकोचे स्मारक उभारले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोइंदुल येथील ही घटना आहे. जहाल नक्षली रामको हीचा एप्रिल महिन्यात पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षली नेता भास्करची याची रामको ही पत्नी होती. बनावट चकमकीत रामकोला ठार मारल्याचा बदला घेण्यासाठी जांभुळखेडा स्फोट घडवले असून रामकोचे स्मारक हे पोलीसांसाठी आव्हान ठरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही येथे पोलीस चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षल कमांडर रामको नरोटी हिचे स्मारक उभारून नक्षल्यानी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. 27 एप्रिल रोजी गुंडूरवाही येथे पोलीस-नक्षल चकमकीत दोन महिला नक्षलवादी टिपण्यात पोलिसांना यश आले होते. गडचिरोली पोलिसांचे नक्षल विरोधी मोहीम नियमित स्वरूपात सुरू असताना गावालगत जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. पोलीस पथकाचा घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी घटनास्थळी मोठा भूसुरुंग स्फोट घडवून आणला.


चकमक संपल्यावर पोलिसांनी घटनास्थळाच्या केलेल्या पाहणीत दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. गट्टा दलम कमांडर आणि कुख्यात महिला नक्षली रामको नरोटी हिचा यात मृत्यू झाला. सोबतच भामरागड दलम सदस्य शिल्पा शिल्पा धुर्वा ही अन्य एक महिला नक्षल चकमकीत ठार झाली. रामको नरोटी गेली पंचवीस वर्षे नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिच्यावर सोळा लाखांचे बक्षीस होते तर सुमारे पन्नासहून अधिक हिंसक कारवायात रामकोचा थेट सहभाग होता. बडा सक्रिय नक्षली नेता भास्कर याची रामको पत्नी होती. भास्करवर दक्षिण गडचिरोलीत नक्षल कारवायांची जबाबदारी आहे. 



नक्षल्यांच्या मते गुंडूरवाहीतील चकमक बनावट होती. याच चकमकीचा बदला घेण्यासाठी 1 मे रोजी नक्षल्यानी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे भुसुरुंग स्फोट घडवून आणला यात 15 पोलीस जवान तर वाहन चालविणारा एक खाजगी चालक यांचे मृत्यू झाले होते. हा हल्ला प्रत्यक्ष भास्कर हजर असताना झाला असा अंदाज आहे. कुख्यात नक्षलीचे तिच्या कोइंदुल या मूळ गावी उभारलेले स्मारक पोलिसांसाठी आता आव्हान ठरले आहे.