९९.९९ टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेल्या मास्कची पुण्यात निर्मिती
एन ९५ मास्कपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार
अरुण मेहेत्रे, पुणे : कोरोनाच्या विषाणुमुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे आणि या संसर्गजन्य विषाणुपासून वाचण्यासाठी वेगवेगळे संशोधन आणि उपाययोजना सुरु आहेत. कोरोनामुळे सध्या मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि यातच आनंदाची बातमी म्हणजे पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने ९९.९९ टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेला मास्क विकसित केला आहे.
लवकरच सेट लॅब इंडिया या कंपनीकडून या मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू होणार आहे. एन. सी. एल. मधील संशोधकांनी तयार केलेला हा असाधारण गुणधर्म असलेला मास्क आहे. या मास्कला विशिष्ट प्रकारचं बायोपिलर नॅनो कोटिंग आहे. जिवाणुच्या सेल्युलोजचा वापर या नॅनो कोटिंगमध्ये करण्यात आला आहे.
डॉ. सय्यद दस्तगिर, डॉ. महेश धारणे आणि डॉ. शुभांगी उंबरकर यांनी केलेल्या संयुक्त संशोधनातून हा मास्क तयार झाला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अँड मटेरियलच्या मास्क संरक्षण मानकानुसार या मास्कची जिवाणु फिलटरेशन क्षमता तपासण्यात आली आहे. तपासणीकरता स्टेफीलोकोकस ऑरीयस या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंचा प्रयोग केला गेला. त्यातून या मास्कची जिवाणू थोपवून ठेवण्याची क्षमता ही ९९.९९ टक्के इतकी असल्याचं निदर्शनास आलं आहे, अशी माहिती एनसीएलचे संशोधक डॉ. महेश धारणे यांनी दिली आहे.
दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना म्हणजेत (सिट्रा) या संस्थेने या मास्कच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. सेट लॅब इंडिया या कंपनीकडून या मास्कचे उत्पादन केले जाणार आहे. येत्या काही दिवसात एक लाख मास्क तयार करण्याचे उद्दिष्ट या कंपनीनं ठेवलं आहे. विशेष म्हणजे सध्या वापरात असलेल्या एऩ 95 मास्कच्या तुलनेत या मास्कची किंमत कमी असणार आहे.
हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस तसेच संसर्गाचा अधिक धोका असलेल्यांसाठी हा मास्क अतिशय उपयुक्त ठरणार आहे.