Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याआधी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत नाना पटोले यांना सुनावलं आहे. महाविकास आघाडीच्या सभेत आपण हा मुद्दा मांडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 


नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या पक्षाशी युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभारविरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत, आमची ही लढाई सुरुच राहिल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या या मुद्द्यावर मविआच्या बैठकीत चर्चा करु. काँग्रेस पक्षातून जर कोणी स्थानिक पातळीवर भाजपाशी हातमिळवणी केली तर त्यांच्यावर मात्र पक्ष कारवाई करेल," असा इशारा नाना पटोले यांनी दिला.


अजित पवारांची प्रतिक्रिया


"काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्यं करतात. कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडत आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याऐवजी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका हातानेच वाजत नाही. अशा वक्तव्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत," असं अजित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत मी हा मुद्दा मांडणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. 


मला काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलायचं नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तो त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावा असं सांगत अजित पवार यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे बाजार समित्यामध्ये आघाडी झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 


"लातूर तालुक्यात महाविकास आघाडीला विचारलं जात नाही, काँग्रेस निर्णय घेतं अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांना मी जयंत पाटील यांच्या कानावर घालण्यास सांगितलं आहे. तुम्ही जर आम्हाला सोबत घेणार नसाल तर आमचा आम्हाला विचार करावा लागेल, मग इतरांना घेऊन पुढे जायचं का? अशी विचारणा करा असं मी त्यांना सांगितलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. 


"क्लीन चीट नाही"


दरम्यान अजित पवार यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा (Maharashtra State Cooperative Bank Scam) प्रकरणी आपल्याला क्लीन चीट मिळालेल्या बातमीत अजिबात तथ्य नाही, चौकशी सुरु आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 


राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख एकरापेक्षा जास्त नुकसान झालं आहे. हवामान खात्याने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. उन्हाळी पिकांचं, फळबागा यांचं नुकसान होत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. आजच्या बैठकीत हा विषय पुन्हा काढणार आहे. बारमाहीला 1 लाख आणि एकरी पिकांना 50 हजार रुपये द्यावेत अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.