मला जबाबदारीतून मुक्त करा; अजित पवारांची शरद पवारांसमोर मागणी
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही? राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचा सवाल. तर बीआरएस आणि वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पदाधिका-यांना खबरदारीचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
NCP Meeting : विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा... अशी मागणी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांनी ही मागणी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. आमदारांच्या आग्रहाखातर विरोधी पक्षनेता झालो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुंबईत राष्ट्रवादीची अत्यंत महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांनी विविष विषयांवर अत्यंत परखडपणे भाष्य केले.
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही?
राष्ट्रवादी पक्षाच्या हातात एकहाती सत्ता का नाही? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. इतर नेत्यांपेक्षा शरद पवार उजवे आहेत. तरी पण कमी का पडलो. मुंबईत सर्वात कमी आपण आहोत. मुंबईत अद्याप अध्यक्ष नाही. मुंबईत पक्ष का वाढला नाही याचा देखील विचार केला पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे
अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत. भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही तर जिथे घोषणा दिल्या जातात तिथे आपले उमेदवार निवडणून आले पाहिजेत. शरद पवार यांच्या विषयी नको ती चुकीची टीका होता कामा नये. आम्ही खपवून घेणार नाही अशा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.
विरोधकांत ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचाच विरोधी पक्षनेता
विरोधकांत ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता असं अजित पवारांनी म्हटलंय. सध्याच्या राजकीय स्थितीवर नक्की विचार करू असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे विधानपरिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा डोळा आहे का असा सवाल उपस्थित झाला होता.
जयंत पाटील यांचा अजित पवार यांना टोला
विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी अजित पवार यांनी केल्या नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेतेपद सोडण्यापेक्षा सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे असा सल्ला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.