खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. विरोधात बसून काय करणार आमच्यासोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे म्हणाले आहेत. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळेंनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही  कधीही आमदार पळवले नाहीत, फोडले नाहीत असं ते म्हणाले आहेत. 


अमर काळे यांनी काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आला आहे. विरोधात काय करणार आमच्या पक्षात या अशी चर्चा आमच्या खासदारांना सोबत केली आहे. सुप्रिया सुळे यांना मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती," असं अमर काळे यांनी म्हटलं आहे. 


संजय राऊतांच्या दाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत हवेत गप्पा मारतात, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. तर अजित पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे, अशी इच्छा शरद पवारांच्या आमदार, खासदारांची आहे, असा दावा सूरज चव्हाणांनी केला आहे. 


सुनील तटकरेंनी फेटाळला दावा


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले आहेत की, "आमदार लोकशाहीच्या माध्यमातून अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेने विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं. माझ्या सार्वजनिक, राजकीय आयुष्यात बाप-लेक असा शब्दप्रयोग मी कधी केला नाही. पण अशी ओंगाळवाणा शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. त्यांच्या तोंडून ती वाक्यं नेहमीच येत असतात". 


पुढे ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, जनतेने दाखवलेली जागा यामुळे हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी जी बैठक बोलावली त्यात सनसनाटी कृत्य बाहेर यावं यासाठी हा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. त्यात काही तथ्य नाही. लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने मी दिल्लीत जात असतो. तिथे अनेक लोक भेटत असतात. विचारपूस करण्याखेरीज इतर काही घडलेलं नाही. पण कोणी कोणाशी संपर्क साधून काय चर्चा केली याची माहिती माझ्याकडे आहे. योग्य वेळी यासंदर्भातील माहिती जनतेसमोर ठेवेन".


"माझ्याकडून काही झालेलं नाही. अमर काळे यांनी ज्यांचं नाव घेतलं त्या पक्षात नाही, पक्षाच्या पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याचं कारण नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.