Dhananjay Munde Death Threat : कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार घडलाय. मंत्री धनंजय मुंडे यांना परळी येथील कार्यालयावर धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे 50 लाख रुपये द्या नाहीतर जीवे मारेन असे धमाकावणाऱ्याने म्हटल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीकांना कराड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ यांच्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही सोमवारी रात्री बारा वाजता एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या नाहीतर धनंजय मुंडे यांना जीवे मारेन अशी धमकी परळीमधील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या लँडलाईन फोनवरून त्या व्यक्तीने दिली होती. या फोननंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये परळी पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.


छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी


नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकीचा फोन आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका व्यक्तीने धमकी दिली होती. छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाडमधून ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात प्रशांत पाटील याने फोन करत धमकी दिली होती.  भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याची धमकी प्रशांत पाटीलने दिली होती. भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याला धमकी देणारा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रशांत पाटीला यांना महाडमधून अटक करण्यात आली आहे.


या धमकीनंतर भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. पवार कुटुंब अशा गोष्टी करत नाहीत. शरद पवार तर मुळीच कधी अशा गोष्टी करत नाहीत. पवार धमकी देण्याची काम करत नाहीत. तर ते वैचारिक लढाई लढतात. अतिउत्साही लोक अशा धमक्या देण्याचं काम करतात," असे छगन भुजबळ म्हणाले.