छगन भुजबळ-धनंजय मुंडे अडचणीत, कट्टर विरोधक मात्र अजित पवारांच्या भेटीला; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुहास कांदे आणि सुरेश धस यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत
छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. तर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या दोन्ही नेत्यांच्या कट्टर विरोधकांनी मात्र अजित पवारांची भेट घेतली आहे. सुहास कांदे आणि सुरेश धस यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत. पाहुयात.
व्हीओ - सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत, तर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत छगन भुजबळांची समजूत काढण्याची गरज आहे, तर धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभं राहण्याची वेळ आहे. मात्र असं काही होताना दिसत नाही. उलट भुजबळ आणि मुंडेंच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या या ना त्या कारणाने अजित पवार गाठीभेटी घेताना दिसत आहेत.
सुहास कांदे आणि छगन भुजबळांचं वैर सर्वश्रुत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नागपुरातल्या शासकीय निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी भेट घेतली. यानंतर दादांनी नाशिकला न्याय दिला, अशी खोचक प्रतिक्रियाही कांदेंनी दिली आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. भाजप आमदार सुरेश धस या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर आक्रमक आरोप करत आहेत. अशा परिस्थितीत सुरेश धस यांनी अजित पवारांनी भेट घेतली आहे. धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट होत नसताना सुरेश धस यांनी मात्र अधिवेशन काळात दुस-यांदा अजित पवारांनी भेट घेतल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मात्र पीकविम्याच्या प्रश्नासाठी भेट घेतल्याचं कारण धस यांनी सांगितलं.
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे...अजित पवारांचे जवळचे सहकारी...मात्र आता दोन्ही नेत्यांच्या कट्टर राजकीय विरोधकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीच्या टायमिंगवरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.