आशीष अम्बाडे, झी 24 तास, गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. तब्बल दोन वर्षांनी शरद पवार विदर्भ दौऱ्यावर असल्याने नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी संपाबाबात पवारांची भूमिका
राज्यात सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना शरद पवार यानी एसटी संपाबाबत मार्ग निघाला पाहिजे असं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर विलीनकरण शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 


राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सेवेत घेणे सोपे नाही. राज्यात खूप महामंडळे आहेत. त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. एकाला सेवेत घेऊन दुसऱ्याला दुखावणे योग्य नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 


हिंसाचारामागे भाजपची भूमिका
राज्यात सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना बाजूला ठेवायला हवं असं सांगत शरद पवार यांनी राज्यातील हिंसाचारावरुन भाजपवर टीका केली आहे. त्रिपुरातील घटनेचे पडसादर अमरावतीत का उमटले असा सवाल करत भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे.


नाना पटोलेंना टोला
स्वबळावर निवडणूकीची भाषा नाना पटोले बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे, असा टोला शरद पवार यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.


जिल्हा विकासापासून दूर
गडचिरोली जिल्हा विकासापासून वंचित आहे, त्याचा फायदा नक्षल संघटनांनी घेतला आहे, जिल्ह्यात विकास महत्वाचा असून सोबतीला कायदा-सुव्यवस्था हवी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दळणवळण साधने नव्हती, कंत्राटदार येत नव्हते, BRO ने उत्तम काम केलं. या कामाने जिल्ह्याने प्रगती साधली जिल्हा परिस्थितीत सुधारणा झाली आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.