ईडी, सीबीआय यांचा सरकारकडून गैरवापर - शरद पवार
पक्षांतर करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले.
पुणे : सरकारकडून ईडी, सीबीआय यांचा गैरवापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढले आहे. काही नेत्यांनी स्वत:ला या कामासाठी वाहून घेतलंय तसेच काही एजन्सीही नेमल्या गेल्या आहेत असे पवारांनी सांगितले. पक्षांतर करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. चित्रा वाघ यांनी देखील आपला राजीनामा सोपावला. तसेच अनेक राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
हसन मुश्रीफ यांच्यावर रेड पडली. त्यांना भाजप मध्ये या असे सांगण्यात आले होते. ते त्यांनी मान्य केले नाही. म्हणून रेड करण्यात आली.
पंढरपूर मधील कल्याण काळे यांचा साखर कारखाना अडचणीत होता. राज्य सरकारने नियम सोडून 30 - 35 कोटी दिले. पण त्यांना अट घातली पक्षांतर करा. त्यांना संस्था टीकवायची होती. त्यांनी पक्षांतर केलं.
छगन भुजबळ यांच्या बाबतीतही तेच करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. त्यासाठी राज्य सरकारचा एक ही रुपया गेलेला नाही. महाराष्ट्र सदनाचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
चित्रा वाघ यांचे उदाहरण. त्यांच्या नवर्यावर एसीबीची केस आहे. तसेच माझ्या सहकारी संस्थांची देखील एसीबीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे मला बाहेर जाण्यास परवानगी द्या. असे चित्रा वाघ यांनी शरद पवार यांना सांगितलं
पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यांचे खाते एनपीए मध्ये आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत केली. आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले. त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांच्या कुटुंबियांना लोकसभा निवडणुक लढवावी लागली.
कर्नाटकच्या मंत्र्यांना मुंबईत जी वागणूक दीली ती पाहता राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही. असा प्रश्न पडतो. सत्तेचा दुरुपयोग याआधी झाला नव्हता.
कालच माझ्याकडे शिवेंद्रराजे आले होते. दीड तास बसले होते. त्यांनी सांगितले, मी पक्षाच्या चौकटी बाहेर नाही
आमदार संग्राम जगताप आणि राहुल जगताप या दोघांचा फोन आला होता. दोघांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं सांगितले. आमच्या विषयी अफवा पसरवल्या जात आहे. असे त्यांनी सांगितले.
मला हे काही नवीन नाही. विधानसभेत 70 चा नेता होतो. नंतर 6 राहीलो. पण जे सोडून गेले ते सर्व पडले. असे एकदा नाही दोनदा झालेय माझ्या बरोबर.