मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. शरद पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करतील. पवारांच्या या दौऱ्याचा नेमका तपशील अजून जाहीर झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी सध्याच्या घडीला शरद पवार यांच्याइतका समर्थ नेता पक्षात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून नेत्यांची घाऊक आयात सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला होता. यामध्ये जगजितसिंह राणा, सचिन अहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, अवधुत तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरला होता. यापैकी मधुकर पिचड आणि भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तर साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 


उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, खासदारकीचा देणार राजीनामा


त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कितपत आव्हान निर्माण करू शकेल, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्यानेही राष्ट्रवादीला उभारी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


भास्कर जाधवांच्या प्रवेशासाठी शिवसेनेची लगबग; विधानसभा अध्यक्षांचा बाईकवरून प्रवास