राष्ट्रवादी नेमकी कुणाची? शरद पवार यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक
NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक दिल्ली मध्ये आज पार पडत आहे . यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे सिल्व्हर ओक या ठिकाणाहून दिल्ली साठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आज नेमके बैठकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील बदली करणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे.
NCP Crisis : महाराष्ट्रात राजकारणात (Maharashtra Politics) काका पुतण्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बुधवारी झालेल्या दोन्ही गटांच्या बैठकीत पक्षातील बहुतांश आमदार आणि नेते अजित पवार यांच्या समर्थनात दिसले. यानंतर अजित पवार यांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला. इतकंच नाही तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या जागी स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले आहे. मात्र, हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही. त्याची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती पण त्याचा सुगावा शरद पवारांना लागला नाही असं देखील म्हटलं जात आहे. दुसरीकडे शरद पवार हे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह दिल्लीला रवाना झाले आहेत.
30 जून रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान अजित पवार यांच्या हातात असेल, असा ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या सगळ्यात आता शरद पवार यांनी 6 जुलै रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता नेमका पक्ष कुणाचा याच्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.
अजित पवारांना 29 आमदारांचा पाठिंबा
शरद पवार यांनी बोलवलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील बंडखोरी, पक्षाची कमान, मालमत्ता, निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. अजित पवारांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचा खरा हक्कदार कोण, हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आमदारांच्या पाठिंब्याच्या बाबतीत अजित पवार हे वरचढ ठरत आहे. अजित पवार गटाच्या मेळाव्यासाठी पक्षाच्या 53 पैकी किमान 29 आमदार माजी आमदारांसह उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याची पुष्टी करणाऱ्या शपथपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यानंतरच्या बैठकीला 16 आमदार उपस्थित होते.
अजित पवारांविरोधात ठराव मंजूर केला जाण्याची शक्यता
अजित पवार यांनी संख्याबळ दाखवून आपणच राष्ट्रवादीचे खरे प्रमुख असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असतानाच शरद पवार गटानेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. मंगळवारी झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जगातील सर्वात भ्रष्ट पक्षाचा एक भाग बनल्याचे सांगितले. दुसरीकडे आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार उपस्थित राहणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार या बैठकीत अजित पवारांविरोधात ठराव मंजूर केला जाऊ शकतो.