इंदापूर : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढवणार आहेत. मागील निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्यानं अनेक ठिकाणी जागांचा पेच निर्माण होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभेच्या जागेबाबतही शंका असल्यानं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि  कॉग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांपैकी एकजण भाजपमध्ये प्रवेश करणार अशीच चर्चा रंगू लागलीय. असं असतानाच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांना भरसभेत टोमणा मारलाय. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केलंय. त्यामुळं भविष्यातील राजकीय घडामोडीचे वेध घेऊन तर हे वक्तव्य केलेलं नाही ना असाच सवाल उपस्थित होऊ लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळं साहजिकच इंदापूर विधानसभेची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रेय  भरणे यांच्यापैकी कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जातायत. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यास भरणे भाजपमध्ये जातील असाही अंदाज बांधला जातोय.. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये जाणार अशाही वावड्या उठवल्या जातायत. 



या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकत्र आले होते. यावेळी भाषण संपवताना अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराचं स्वतःच्या मतदारसंघात स्वागत केलं. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलय. येत्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडिंचा अंदाज घेऊन अजितदादांनी असा टोमणा मारला नाही ना अशीच चर्चा आता रंगली आहे.