सातारा : राष्ट्रवादीला आज आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादीची अनेक वर्षे धुरा सांभाळणारे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडक कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे. आज फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, होय, नाही म्हणारे खासदार उदयनराजेही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त आहे.


राष्ट्रवादी पक्षालाला सातारा जिल्ह्यातील हा तिसरा मोठा झटका आहे. आधी साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले त्यानंतर उदयनराजे भोसले आणि आता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रूपाने राष्ट्रवादी मोठा धक्का बसणार आहे.


दरम्यान, विद्यमान खासदार उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्लीत त्यांचा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.  येत्या १४ सप्टेंबरला उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत. 
गुरुवारी सकाळी उदयनराजे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र त्यानंतर संध्याकाळी उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी आल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.