जेव्हा जेव्हा सभेत पाऊस येतो...; रोहित पवार अमेरिकेतील सभेबाबत असं काही म्हणाले की...
तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी...
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा sharad pawar शरद पवार यांच्या नावाला कमालीचं वजन आहे. अनेक दशकं राजकीय वर्तुळात आपली छाप सोडणाऱ्या या नेत्यानं मागील वर्षी सर्वांनाच थक्क करुन सोडलं होतं. निमित्त होतं ते म्हणजे साताऱ्यातील एका सभेचं. सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग अगदी दिल्लीदरबारी उमटलेले पडसाद. सर्वत्र चर्चा पवारांच्या त्याच सभेची झाली होती. त्यांच्या याच सभेची पुनरावृत्ती अमेरिकेत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Joe biden rally in Florida अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या जो बायडेन यांच्या फ्लोरिडा येथील सभेत हेच चित्र पाहायला मिळालं. ज्याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली. बायडेन यांच्या सभेतही त्यांनी भाषण सुरु करताच पावसाला सुरुवात झाली. बस्स, मग काय... पाऊस, नेता आणि भाषण बऱ्याच गोष्टी ओघाओघानं समोर आल्या.
रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं, 'जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल'. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असं लिहित त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सांगावं तर, ३ नोव्हेंबरला या पदासाठी मतदान होणार असून, ४ नोव्हेंबरला नव्या राष्ट्राध्यक्षाची निवड होणार आहे. परिणामी सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांचाही प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.