फडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....
फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या बऱ्यात काळापासून भाजपविरोधी वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकासाघाडीकडून सातत्यानं विरोधी पक्षावर निशाणा साधण्यात येत आहे. पण, असं असलं तरीही राजकीय शत्रुत्वामध्ये सहसा पदाचा मान राखूनच टीका करण्यात येते. पण, सध्या मात्र एका प्रसंगानं या धारणेला शह दिल्यामुळं खुद्द राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीच ठाम भूमिका मांडली आहे.
विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांना नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं. ज्यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली गेली. पण, सोशल मीडियावर मात्र या प्रकरणात काही मर्यादा ओलांडल्या गेल्याचं पाहायला मिळालं.
फडणवीसांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेकांनीच ट्विट केलं असतानाच एका ट्विटर युजरनं ते कोरोना झाल्याचं नाटक करत असल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीचा संदर्भ देत तेथे भाजपच्या संभाव्य पराभवाचं खापर हे आपल्यावर फोडलं जाऊ नये यासाठीच ते हे नाटक करत असल्याचं म्हणत त्यांच्यावर या प्रसंगीसुद्धा टीका केली गेली.
रोहित पवार यांनी याच युजरला खडे बोल सुनावत एक ट्विट केलं. 'देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे', असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हणत नेता आणि पदाचा मान हा राखला गेलाच पाहिजे असा सूर आळवला.
याच ट्विटमध्ये रोहित पवार यांनी भाजपच्या पराभवाबाबतही भाष्य केलं. त्याच ट्विटमध्ये मांडलेल्या ओळीचा उल्लेख करत बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करत आहेत असं म्हणत राजकीय विरोधकांवर निशाणाही साधला.