माढा : सांगोला येथील माढा मतदार संघात सुरु असणाऱ्या दुष्काळ परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या संबोधनपर भाषणात अतिशय महत्वाच्या मुद्दयांवर वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प आणि सध्या सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडी या विषयांवर त्यांनी वक्तव्य करत आगामी निवडणूक लढवण्याविषयीसुद्धा सुचक विधान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणादरम्यान पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेल्या कर्जमाकर्जमाफीवर लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीचा  मुद्दा उचलून धरत त्यांनी गतकाळातील काही प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. ज्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकालात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेत त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. दर दिवशी या देशात शेतकरी आत्महत्या करत असून, सरकार मात्र त्यावर काहीच पावलं उचलत नसल्याचं खंतही त्यांनी व्यक्त केली. 'वर्षभरासाठी सरासरी कुटुंबात पाच व्यक्ती असणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाला सहा हजार रुपयांची तरतूद.... ही काही कर्जमाफी झाली का?', असा प्रश्न उपस्थित करत, 'कर्जमाफी तर आम्ही दिली होती....' हे विधान त्यांनी केलं. इतकच नव्हे, तर त्यांनी आपल्या कार्यकाळात दिलेल्या कर्जमाफीचे आकडेही यावेळी मांडत व्याजदरात केलेली कपातही निदर्शनास आणली. 


पवारांनी या कार्यक्रमादरम्यान आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये त्यांच्या सहभागाविषयीसुद्धा सूचक वक्तव्य केलं. माढा मतदार संघातून निवडणूक लढण्याविषयी वक्तव्य न केल्यामुले यावेळी उपस्थितांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर पवारांनी उपस्थितांचा कल पाहात एक स्मितहास्य करत लक्षवेधी वक्तव्य केलं. २०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या उमेदवारीविषयी जाहीर करा असं सांगितलं असता, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन निर्णय कळवतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता हा निर्णय पवार नेमके केव्हा कळवणार आणि त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केव्हा केलं जाणार याचीच उत्सुकता संपूर्ण राजकीय विश्वात पाहायला मिळत आहे.