शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू
शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे.
मुंबई : शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस शिवसेनेसह सरकार स्थापन करायला सकारात्मक आहेत. या पार्श्वभुमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर निर्णय घेण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.
काँग्रेसने राज्यात शिवसेनेसोबत जायचे का ? याबाबतचा निर्णय सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. सोनिया गांधींनी सकारात्मक भूमिका घेतली तर काय करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक असल्याची सूत्रांची माहिती
महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सोनिया यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे आता सोनिया गांधी काय भूमिका घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसने आधी भूमिका ठरवावी, सोनिया गांधींची परवानगी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसच्या या नेत्यांना दिला. शरद पवारांच्या या सल्ल्यानंतर काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा यासाठी शिवसेना आग्रही आहे. पण भाजपकडून मात्र शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य होत नाहीये. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधले संबंध ताणले गेले आहेत. त्यातच आता काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळ्या हालचाली सुरु केल्या आहेत.
राज्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपने १०५ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळवला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र यायचं ठरवलं तर भाजपला सत्तेपासून लांब राहावं लागू शकतं.