राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरु झाली असून आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी (NCP MLA Disqualification Hearing) सुरु झाली असून आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. 25 जानेवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. दोन्ही गटाच्या बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर याबाबत पुरावे कपाटात ठेवण्यात आले होते. मात्र ते गायब झाल्याचा दावा केला.
"पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. ही कागदपत्रं कपाटात ठेवण्यात आली होती. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही," असं आव्हाड म्हणाले आहेत.
अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी मी निवडणूक कमेटीचा भाग नव्हतो. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे याची गरज वाटत नाही असं म्हणाले. जुलै ते सप्टेंबर दरम्यान ब्लॉक कमिटीच्या निवडणूका झाल्या होत्या का? अशी विचारणा करण्यात आली असता आव्हाडांनी होय माझ्या माहितीनुसार घेण्यात आल्या होत्या असं उत्तर दिलं. जिल्हा कमिटीच्या निवडणूका झाल्या होत्या का? असं विचारलं असता आव्हाडांनी सतत तोच तोच प्रश्न विचारला जात आहे. मी सांगितलं की सगळया निवडणूका घेतल्या गेल्या होत्या असं स्पष्ट केलं.
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रिय निवडणूका झाल्या होत्या असंही उत्तर त्यांनी दिलं. दरम्यान पुरावे मागण्यात आले असता जितेंद्र आव्हाडांनी इथे पुरावे कुठून आणू? असा संताप व्यक्त केला. हो किंवा नाही असं उत्तर देण्यास सांगितलं असता, ते म्हणाले की, "सगळे पुरावे आहेत. ते सगळे पुरावे गुप्ततेच्या दृष्टीने कपाटात ठेवले होते. मात्र त्यातील दोन पदाधिकारी अजित पवार गटाच्या हाताला लागले. त्यांनी ह्या कागदपत्रांच काय केलं माहिती नाही. त्यांनी कोणती कागदपत्रं नेली माहिती नाही".
या दोन माणसांकडून ते कागतपत्र परत मिळविण्यासाठी पत्र व्यवहार केला होता का? असं विचारलं असता माझ्या सहीचे अशी विचरणा करणारे कोणतेच पत्र मी लिहिलेले नाही असं म्हणाले. तुमच्या माहितीप्रमाणे असे पत्र लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे? असं विचारलं असता आव्हाडांनी माझ्या माहितीनुसार असं पत्र लिहिण्याचा अधिकार पक्षाचे राज्य अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याकारी सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष यांना आहे.
दरम्यान यासंबंधी कोणतंही पत्र लिहिण्यात आलं नसून, कोणतीही तक्रार केली नसल्याचीही माहिती दिली. तुमच्या माहितीनुसार पक्षातील घटनेतील संरचनात्मक निवडणुका या देशातली सर्व राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात, जिथे तुमच्या पक्षाचे अस्तित्व आहे तिथे झाल्या होत्या का? यावर आव्हाड संतापून म्हणाले "तोच तो प्रश्न किती वेळा विचारणार आहे. मी काही गुन्हेगार आहे का? मी कोणत्याची गुन्हेगारी केस मध्ये साक्ष नोंदवत नाही. मला गोंधळवले जात आहे".