वादा तोच पण, दादा नवा...! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पुण्याचा `दादा` कोन अशी चर्चा आता फ्लेक्सवर रंगलीय...! उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादा ची जागा रोहित पवार घेत आहेत का...?
हेमंत चापुडे, झी मीडिया
Rohit Pawar: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता बॅनरवर रंगली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात वादा तोच..! पण .. दादा नवा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बॅनरमुळं उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादाची जागा रोहित पवार घेत आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित दादाच होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची चर्चा आहे. याला कारण म्हणजे मंचरच्या कळंब येथे करण्यात आलेली बॅनरबाजी.
'वादा तोच...! पण दादा नवा' ही टॅगलाइन देऊन रोहित पवारांचे बॅनर पुणे नाशिक महामार्गावर झळकले आहेत. याचे कारणही तसंच आहे. बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी शरद पवारांची मंचर येथे सभा होणार आहे. या सभेसाठी मी येतोय असा संदेशदेखील दिला जातोय. तर, दुसरीकडे वादा तोच पण दादा नवा अशी टॅगलाइनचे बॅनर झळकल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळं पुण्याच्या दादाची जागा आता रोहित पवार घेत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी आज याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्ते प्रेमापोटी काय बोलतात हे आपल्याला सांगता येणार नाही. आता फर्त ही लढाऊ विचारांची आहे कोणत्याही नेत्याची नाही. आता फक्त आदरणीय पवार साहेब सर्वांना सोबत घेऊन लढत आहेत, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार हे बिल आणत आहे. ते कोर्टात टिकले पाहिजे. यापूर्वी जे आरक्षण दिले होते ते कोर्टात टिकले नाही. आज मुख्यमंत्री साहेब काय बोलतील ते पाहणे महत्त्वाचे आहे. पुन्हा आरक्षण दिले आणि सरकारने लोकसभा काढली तर पुन्हा आरक्षण जाऊ नये, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कारवाई टाळण्यासाठी अजितदादा भाजपसोबत
अजित दादा आणि सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर गेले नाही. स्वतःवर होणाऱ्या कारवाई टाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. हे भाजपलाही माहिती आहे. नंतर भाजप त्यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्ही 10-20 जागाचं लढा. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत सुद्धा असेच झाले आहे.