दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज दुपारी पुन्हा बैठक होत आहे. या बैठकीत आमदारांनी शरद पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे पाच आमदार अद्याप पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या संपर्कात पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर तीनही पक्षाचे नेते भाजपा आणि अजित पवार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार हे तीन पुढील रणनिती ठरवत आहेत. या संकटाचा मुकाबला तीनही पक्षांनी एकत्र येऊन समर्थपणे करायचा निर्णय या पक्षांनी घेतला आहे.


काँग्रेसच्या सर्व आमदारांना विमानतळाजवळील जे. डब्ल्यू मॅरियट हॉटलेवर ठेवलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज राज्यासंदर्भात 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीचा काय निकाल लागतो ? त्यावर काँग्रेस आमदारांना मुंबईतच ठेवायचे की राज्याबाहेर हलवायचे हे ठरवलं जाणार आहे. 
निकालानंतर त्यांना हलवायचे ठरलं तर जयपूरला नेण्यात येणार आहे. त्यासाठी एक विशेष विमान तयार ठेवण्यात आले आहे.



महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात


देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे.  या प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. 


कोणत्या मागण्या  ?


१. आजच (रविवारी) विधीमंडळात फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश द्यावे.
२. आजच विधानसभा सदस्यपदाची शपथ द्यावी.
३. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या आधारावर शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले. त्या संदर्भात कागदपत्रे सादर करावी. (कर्नाटकात जी परमेश्वरराव केसमध्ये सुप्रीम कोर्टानं कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचा संदर्भ देऊन मागणी केलीय.)
४. फ्लोअर टेस्टचं व्हिडीओ रेकाँर्डींग करावं आणि त्याची काँपी सर्वोच्च न्यायालयात सादर करावी.
५. फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात यावा.
६. विधीमंडळात शक्तीप्रदर्शन चाचणीवेळी समर्थन आणि विरोधी गट तयार करावे. त्यानंतरच मतमोजणी करावी. म्हणजे समर्थनातील एका बाजूला उभे करावे आणि समर्थन नसलेले दुसऱ्या बाजूला उभे करावे. 
७. फ्लोअर टेस्ट होई पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासंदर्भातचे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये.