मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेले दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही कोल्हे यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'१ जुलै ते ४ जुलै या कालावधीमध्ये मी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्कात आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळालं. यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी केली, ती निगेटिव्ह आली,' असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.



'मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. 



'त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करू शकता,' असं आवाहन त्यांनी केलं आहे.