Maharashtra Politics : महायुतीत ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदं असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नसल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाल असल्यानं शिवसेने ऐवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीने मागितली आहेत. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गट आणि पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत. शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं नवा फॉर्म्युला आणल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्ट्राईक रेटवर समसमान मंत्रिपदाची मागणी


लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला असल्याची शिवसेनेने जोरदार जाहीरात केली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने स्ट्राईक रेटवरुन आपल्या परफॉर्मन्सची तुलना करण्यास सुरुवात केलीय. महायुतीत सर्वात कमी जागा लढवून भाजप खालोखाल सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. मंत्रिपदं देताना कुणाचे किती आमदार हा फॉर्म्युला लावण्याऐवजी स्ट्राईक रेटचा फॉर्म्युला लावा असा आग्रह राष्ट्रवादी अजित पवार गटाने केला आहे. शिवसेनेचे 57 आमदार असले तरी जेवढी शिवसेनेला मंत्रिपदं मिळणार तेवढीच राष्ट्रवादीला मंत्रिपदं मिळावीत अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.


मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरुन एनसीपी-शिवसेनेत जुंपली


राष्ट्रवादीच्या या नव्या फॉर्म्युल्याच्या मागणीमुळे शिवसेना संतापली आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अवघे दोन दिवस उरले असताना राष्ट्रवादीनं मंत्रिपदासाठी नवे फॉर्म्युले शोधणं चांगलं नाही असं शिवसेने म्हटलं आहे.


भाजपकडे सर्वात जास्त मंत्रिपदं जाणार हे स्पष्ट आहे. पण भाजपनंतर सर्वात जास्त मंत्रिपदं कुणाला मिळणार यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत स्पर्धा सुरु झालीये. आता महायुतीचे नेते मंत्रिपदं देताना आमदारांची संख्या विचारात घेतात की स्ट्राईक रेटचा विचार करतात हे 5 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.