“महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे (Spriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्र आणि दिल्लीत दोन राजकीय भूकंप होतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी हे विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व चर्चा निष्फळ असल्याचा दावा केला आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार कुठे आहेत? अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, "तुम्ही सर्व चॅनेलवाल्यांनी एक युनिट त्यांच्या मागे लावून द्या, म्हणजे तुम्हाला समजेल ते कुठे आहेत. राज्यात अनेक समस्या आहेत. राज्यात अनेक कामं चुकीच्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते. एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही".
अजित पवार भाजपाला पाठिंबा देणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की "हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा. माझ्याकडे अशा चर्चा करण्यासाठी वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे अनेक कामं आहेत. त्यामुळे माझ्याकडे याची काही माहिती नाही. अजित पवार मेहनत करणारे असल्याने त्यांच्याबद्दल अशा चर्चा होत असतात".
दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात पुढील 15 दिवसांत राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान केलं होतं. त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी, एक नाही दोन राजकीय भूकंप होणार आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात असं उत्तर दिलं.
शरद पवार काय म्हणाले आहेत?
"जी चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्याच मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्वं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे सर्व सहकारी एकाच विचारानं पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. याव्यतिक्त दुसरा कुठचाही विचार कोणाच्या मनात नाही," असं सांगत शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याआधीही अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे
महाविकास आघाडीमधील नेत्यांशी असणारे मतभेद आणि शरद पवार-अजित पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अजित पवार यांनी याआधीही भाजपाला पाठिंबा दिला असल्याने चर्चांना पाठबळ मिळत आहे. 2019 मध्ये पवार यांनी फडणवीसांच्या साथीने सरकार स्थापन केलं होतं. पण शऱद पवार यांच्या दबावानंतर त्यांनी माघार घेतली होती. 72 तासात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.