भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते - रामदास आठवले
अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले.
मुंबई - अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. कसलाही मागमूस लागू न देता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या या आघाडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, अशा पद्धतीने दोन विरोधी पक्षांनी एकमेकांना साह्य करणे सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारे ठरणार आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक केले. राजकारणात काहीही होऊ शकते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते, असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
नगरमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिवसेना महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्यांना २४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला १८ आणि काँग्रेसला पाच जागांवर यश मिळाले होते. कोणालाच बहुमत नसल्याने आणि कोणीही निवडणुकीत आघाडी न केल्याने महापौर कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती.
शुक्रवारी सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून महापालिका भवनात आले. यानंतर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिका भवनात प्रवेश केला. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. निवडणुकीत त्यांना एकूण ३७ मते पडली. यामध्ये भाजपची १४, राष्ट्रवादीची १८, बसपची ४ आणि एका अपक्षाचा समावेश आहे. तर शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांना २३ मते मिळाली.