नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार हे नाराज आहेत. लवकरच ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून बोर्डाच्या धर्तीवर दहावी सराव परीक्षेचे आयोजन अनंत सुतार यांच्याकडून करण्यात येत होते. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी हा उपक्रम नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या  माध्यमातून सुरू ठेवला. या सराव परीक्षेचे फलक संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवरून अनंत सुतार यांचा फोटो गायब आहे. अनंत सुतार हे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असूनही त्यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आमदार संदीप नाईक आणि जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्यात वाद? 


राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी सुतार यांचा कार्यक्रम हायजॅक केल्याची भावना सुतार यांची झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जरी कार्यक्रम आमदार घेत असले तरी पोस्टरवरुन आपल्याला का हटविले, यामुळे सुतार हे आमदारांवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नवी मुंबई  गणेश नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. गेली कित्येक वर्ष नवी मुंबईतील राजकारण हे नाईक यांच्याच भोवती आहे. मात्र, आतापर्यंत उघड नाराजी व्यक्त केली नव्हती. सुतार यांनी ही नाराजी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी ही नाराजी दबक्या आवाजात बोलून दाखवली आहे.


अनंत सुतार हे खूप नाराज आहेत. ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, माजी मंत्री गणेश नाईक यांच्या जवळचे सुतार मानले जातात. त्यामुळे गणेश नाईक हे त्यांची समजूत काढतील, अशीही चर्चा आहे. ते राष्ट्रवादी सोडणार नाहीत, अशी एक चर्चा आहे. मात्र, जर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर ते कोणत्या पक्षात जाणार, याचीच जास्त चर्चा नवी मुंबईत रंगत आहे.