NCRB Report : गेल्या काही वर्षांत देशभरात महिलांविरोधातील गुन्हे आणि महिला अत्याचाराचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच, राष्ट्रीय गुन्हे नोंदणीमधून नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातही महाराष्ट्रातही गुन्हेगारी वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. गेल्या काही वर्षात भारतातील बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे विश्लेषणातून समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालातून समोर आलं आहे. लहान मुला-मुलींसंदर्भात देशभरात 1 लाख 62 हजार गुन्हे दाखल झाले आहे. मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांत 8.7 टक्के वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.


देशात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातही अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात अल्पवयीन मुलांवरी अत्याचाराचे 1 लाख 62 हजार 449 गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार आणि अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात 20 हजार 762 गुन्हे दाखल आहेत. 


दुसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात 20 हजार 415 गुन्हे दाखल आहेत. तर उत्तर प्रदेशात 18,682, राजस्थानमध्ये 9370 आणि पाचव्या स्थानावर असलेल्या ओडिशात 8 हजार 240 गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात 999 सर्वाधिक अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर केरळ राज्यात 930 अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तेलंगणात 113 मुलींशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या तब्बल 14 घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर  आहेत. उत्तर प्रदेशात तब्बल 37 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.


दरम्यान, सर्वसाधारणपणे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमची मुंबईत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. ताज्या अहवालानुसार, नोंदणीकृत गुन्ह्यांच्या संख्येत मुंबई दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, गतवर्षी देशात एकूण 58 लाख 24 हजार 946 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात आयपीसी अंतर्गत 35 लाख 61 हजार 379 गुन्ह्यांचा आणि राज्यातील विशेष कायद्यांतर्गत 22 लाख 63 हजार 364 गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये गुन्ह्यांमध्ये 4.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये संपूर्ण देशात उत्तर प्रदेश प्रथम, महाराष्ट्र द्वितीय आणि मध्य प्रदेश तृतीय क्रमांकावर आहे.