मुंबई : मला राज्यसभा देण्याचे आश्वासन दिले गेले आहे तसेच एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ देण्याचा आश्वासन दिले गेले असल्याचे सामाजिक न्याय व विकास मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुलुंडमधील भीम महोत्सव या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रामदास आठवले आले होते त्यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत युतीत असलेल्या रामदास आठवलेंना उमेदवारी मिळण्याची आशा होती. पण भाजपा आणि सेनेत झालेल्या उमेदवारीच्या वाटाघाटीत रामदास आठवलेंना स्थान दिले नाही. त्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याने मी नाराजी न ठेवता पुन्हा प्रचाराला लागलो आहे अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. 'राजकारणात काम करायचं असतं तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही असेही ते म्हणाले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी देखील आठवले यांना उमेदवारी न दिल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. 



रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी मिळण्याची ईच्छा व्यक्त केली होती. विद्यमान खासदार किरिट सोमय्या यांचा हा मतदार संघ आहे. पण शिवसेनेच्या विरोधानंतर सोमय्या यांच्या जागी मनोज कोटक यांना ही उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर रामदास आठवलेंच्या या इच्छेवर देखील पाणी सोडल्याचे दिसले. काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येतो आहे पण आम्ही मोदींसोबत राहणार आहोत असं रामदास आठवले यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरपीआयच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचेही ते म्हणाले. आम्हाला अनुल्लेखाने मारू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. यामुळे त्यांच्या उमेदवारी मिळण्याच्या भावना तीव्र होत्या हेच स्पष्ट होत आहे.