गणपतीसाठी कोकणात यायचं असेल तर... सरपंचांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
कोरोना संकटात कोकणातल्या सरपंचांचे नवे नियम
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. १४ दिवसांचा हा कालावधी पूर्ण करणं प्रत्येकासाठी बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
कणकवली तालुक्यातल्या खारेपाटणमध्ये राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातल्या सरपंचांची आज एक बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातल्या २५ ते ३० गावांचे सरपंच या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर आता गणेशोत्सवाची लगबग घरोघरी सुरू होते. पण सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळ आणि त्यामध्ये दररोज याबाबत वेगवेगळे निर्णय येत आहेत, त्यामध्ये या निर्णयाची भर पडली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास देणं बंधनकारक करण्याबाबत आणि ७ ऑगस्टला रात्री १२ नंतर कोणालाही कोकणात प्रवेश न देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बैठकीत चर्चा झाली होती. पण नारायण राणे यांनी याला विरोध केला होता. कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी, असं होऊ शकत नाही. असा आदेश निघाला नाही, पण जर बंदी आदेश आला तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. घरी जाण्यासाठी ई-पास कशाला हवा? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला होता.