`त्या कंपन्या परराज्यात गेल्या, आता नवी गुंतवणूक आणा`, पृथ्वीबाबांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसंच फडणवीस सरकारने घोषणा केलेल्या कंपन्याही परराज्यात गेल्याचं पृथ्वीराज चव्हाण या पत्रात म्हणाले आहेत.
'फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार, असे जाहीर केले होते, पण ही कंपनी तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये गेली. विस्ट्रॉन ही कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात ऍपलची एकही कंपनी नाही. आता पेगाट्रोन कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. तिला आपल्या राज्यात आणलं पाहिजे,' असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
'केंद्र सरकारने १ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणुकीकरता जाहीर केलेल्या पीएलआय योजनेअंतर्गत ऍपल फोन बनवणाऱ्या तैवानच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत, त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत', असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.