NEET Exam Scam Case : वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता नीटच्या पेपरफुटीप्रकरणी  लातूर कनेक्शन उघड झाले होते. नीट परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका शिक्षकाला अटक करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते. त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत, तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली. नीटमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल


लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधून धाराशिवला हे पैसे पाठवण्यात आल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर धाराशिवमधून दिल्लीला हे पैसे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूर येथील संजय तुकाराम जाधव (४०, जि. प. प्राथमिक शाळा, टाकळी, ता. माढा) आणि जलिलखान उमरखान पठाण (३४, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, कातपूर, ना. जि. लातूर) हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत होते. 


हे दोघेही उमेदवारांना परीक्षा पास करुन देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने लातुरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते. पठाणला रात्री अटक झाली आहे. एटीएसने त्यांचे मोबाईल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या फोन गॅलरीमध्ये 12 वर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पवेश पत्रांच्या प्रती आढळल्या. 


दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल


यासोबतच परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉटसअॅप चॅट आढळले. जलिलखान पठाण याने संजय जाधवला काही प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचे दिसून आले. संशयित संजय जाधव याने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचे आश्वासन दिले होते. अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मष्णाजी कोनगलवार (नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव) यास व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचे कबूल केले. 


संजय जाधव याच्या माहितीनुसार इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या नीट-2024 परीक्षेमध्ये पैशाचे मोबदल्यात प्रवेश मिळून देण्याचे अवैध काम करीत आहे. प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने लातुरातील दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.