नेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार
नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. सिडकोने बांधलेली रेल्वे स्थानकं सज्ज असून रेल्वेकडून चाचणी केली जात आहे. तांत्रिक चाचण्या अजून बाकी आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
नेरूळ ते उरण दरम्यानच्या प्रस्तावित स्थानकात फलाट बांधून झालेत. तिकीट खिडक्या, मार्गीका, जिने बांधून तयार आहेत. रूळ तपासणी आणि विद्युत प्रवाह जोडण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होईल, असं सिडकोने म्हटलं होतं. पण ही सेवा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा विलंब लागू शकतो.
सिडकोकडून रेल्वे स्टेशन पूर्ण झाली असली तरी, रेल्वे प्रशासनकडून या मार्गाची तांत्रिक चाचणी करण्याचे काम सुरू आहे. यातील महत्वाच्या चाचण्या बाकी आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनची (रेक) व्यवस्था अजून करण्यात आलेली नाही. यामुळे हा मार्ग सुरू होण्यास विलंब लागणार यात शंका नाही.