विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : साहित्य संमेलन आणि वाद हे तसं जुनंच नातं. उस्मानाबादेत होणाऱ्या साहित्य संमेलनावरून नवा वाद सुरु झाला आहे. यावेळी वादाचा मुद्दा आहे तो संमेलन अध्यक्षांचा धर्म. त्यावरून महामंडळ पदाधिकाऱ्यांना सध्या धमक्यांचे फोन येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना गेल्या दोन दिवसांत शेकडो फोन कॉल्स आहेत. आणि प्रत्येक कॉलमध्ये त्यांना एकच जाब विचारला जातो आहे.


फादर फ्रान्सिस दिब्रेटोंना साहित्य संमेलन अध्यक्ष का केलं?
एका ख्रिश्चन धर्मगुरुला साहित्य संमेलन अध्यक्ष का केलं?
साहित्य क्षेत्रात फादर दिब्रेटोंचं योगदान काय?


दिब्रिटो यांनी हिंदूंचं धर्मांतर केलं. गोवंश हत्याबंदीला विरोध केला, असंही ठाले पाटलांना सुनावलं जातं आहे. कहर म्हणजे तुम्हाला पाहून घेऊ, महागात पडेल अशी धमकीची भाषा देखील वापरली जाते आहे.


फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडं धर्मगुरू म्हणून नव्हे, तर साहित्यिक म्हणून पाहा, अशी कळकळीची विनंती करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. ख्रिश्चन धर्मगुरू एवढीच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख नाही. तर मराठी भाषेतून त्यांनी विपुल साहित्य लेखन केलं आहे. सुवार्ता सारख्या मासिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलं. पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व ही त्यांची खरी ओळख आहे.


त्यामुळं केवळ धर्माच्या आधारावर नव्या साहित्य संमेलन अध्यक्षांना होणारा हा विरोध महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही.