कोल्हापूर : भाजपशी जास्तच जवळ गेल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हक्कालपट्टी करण्यात आली. सदाभाऊ यांनी स्वाभिमानी कोट्यातून मिळालेले पद सोडण्याचे आव्हानही देण्यात आले. मात्र, त्यांनी हे पद सोडलेले नाही. दरम्यान, सदाभाऊ खोत नवी संघटना काढणार असल्याचे संकेत दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच सदाभाऊ खोत यांनीही त्याला तसेच प्रतिउत्तर दिले होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. दरम्यान, या वादानंतर त्यांच्याकडे संघटना कार्यकारीणीने स्पष्टीकरण मागितले होते. 


सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. माझी हाकलपट्टी करण्याइतपत त्यांची पात्रता आहे की नाही, याबद्दल मी काहीही बोलणार नाही. माझ्यावर जे वार झाले त्या बद्दल मला खूप मोठ दु:ख होत आहे. मला भाजप धार्जीणे म्हणणाऱ्यांनी स्वत: कोणासोबत युती केली याची यादी काढावी. आम्ही बाहेर पडणार आहे. आम्ही बाहेर पडणार असं म्हणणारे अजून भाजप सोबत का ? असा सवाल खोत यांनी केला.


वादानंतर हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना काढणार  असल्याचं जाहीर केले आहे. येत्या दसऱ्याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं नाही.


राज्यभरातील शेतकऱ्यांची मते जाणून संघटनेचे नाव ठरवले जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावे सुचवली असल्याचंही खोत म्हणाले.