दीपक भातुसे, मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने शासकीय नोकरभरती बंद केली असली तरी आरोग्य खात्यात मात्र मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या मोठ्या संकटामुळे सरकारने सगळे लक्ष आरोग्य यंत्रणेकडे वळवले आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून रिक्त असलेली पदं भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुण, तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.


किती पदं भरली जाणार?


आरोग्य खात्यात तब्बल १७ हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


कोणत्या रुग्णालयात भरती होणार?


आरोग्य खात्यात होणाऱ्या भरतीबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य विभागाची रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण, महापालिका रग्णालयांत रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


कोणती पदं भरली जाणार?


डॉक्टर वर्ग १, डॉक्टर वर्ग २, नर्स, कार्यालयीन कर्मचारी, कारकून. वॉर्ड बॉय, शिपाई, सफाई कामगारांसारखी अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदं अशा वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एकही जागा रिक्त राहू नये, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.


 



ससून रुग्णालयात ५०० जागा रिक्त आहेत. ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागांवर पदोन्नतीही व्हायला हवी. नोकर भरतीसाठी जे शक्य आहे ते सर्व करावे, जिथे होणार नाही, तिथे संबंधित सचिवांनी कारवाई करावी, पण सर्व जागा भराव्यात, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


आरोग्य विभागात सुमारे २० ते २५ हजार रिक्त असून ती तातडीने भरली जातील, कोणत्याही परिस्थितीत पदं रिक्त राहाता कामा नयेत, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.