Mumbai Pune Mumbai: मुंबई-पुणे प्रवास आता आणखी जलद होणार आहे. नागरिकांना रोज अनेकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, आता प्रवाशांची ही तक्रार दूर होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याठी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूला थेट पुणे-सातारा-सोलापूरला जोडणारा द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. पण या प्रकल्पामुळं मुंबई-पुणे प्रवास वेगवान होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पुणे महामार्गावर दररोज मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, घाट परिसर आणि वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा यामुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसंच, कामानिमित्त अनेकजण दररोज मुंबई-पुणे प्रवास करतात. त्यांना नेहमीच वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. नागरिकांची ही अडचण आता दूर होणार आहे. 


मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा अटल सेतूला थेट पुणे-सातारा-सोलापूरला जोडण्यात येणार आहे. या नव्या पर्यायी मार्गामुळं सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे. अटल सेतू आणि जवाहरलाल नेहरू बंदराला जेएनपीटी थेट पुणे-सातारा-सोलापूरला जोडण्यात येणार आहे. त्याचवेळी पुणे-शिवारे जंक्शन असा 130 किलोमीटर लांबीचा आणि आठ मार्गिकांचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 17 हजार 500 कोटी रुपये खर्च होणार आहे. एनएचएआयच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एमएसआरडीएकडून लोणावळा घाट परिसरात आणखी एक मार्गिका (मिसिंग लेन) तयार करुन महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. मात्र, भविष्यात या मार्गावरील वाहनांची संख्या वाढू शकते त्यामुळं हा मार्गही अपुरा पडू शकतो म्हणूनच या मार्गासाठी एक पर्यायी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी आणखी एक पुल खुला होतोय


मुंबई-पुणे प्रवासासाठी ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडीपूल-2 सह नवीन ठाणे खाडी पूल-3 चा पर्याय उपलब्ध होणार आहे. लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे अर्थात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुणे-मुंबईचा प्रवास वाहतुककोंडी मुक्त करण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.