नाशिक : सप्तश्रृंगी गडावर १ जानेवारीपासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. सप्तश्रृंगी गडावरील मंदिरातील गाभाऱ्यातील दर्शन बंद होणार आहे. तर आरतीसाठी महिलांना साडी आणि पुरुषांना सोवळं घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंग गडावरील देवीचं दर्शन घेण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाभाऱ्यातील दर्शनासाठी दिला जाणारा ऑनलाइन किंवा कार्यालयातून दिला जाणारा पास ही बंद होणार आहे. एवढंच नव्हे तर आरतीला उपस्थित राहायचं असल्यास महिलांना साडी आणि पुरुषांना सोवळं घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. साडी नेसलेल्या महिलांनाच आरतीच्या वेळी प्रवेश दिला जाणार आहे, गडावरील पावित्र्य राखण्यासाठी सप्तशृंग देवी ट्रस्टनं हे निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीदेवी गडावरील व्हीआयपी गाभारा दर्शन सप्तश्रृंगीदेवी गडाचे पावित्र्य राखण्यासाठी कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी झाली होती. त्यानंतर हा निर्णय़ ट्रस्टने घेतला आहे. वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीने देखील गाभारादर्शन पूर्णपणे बंद करून देवीचे माहात्म्य जपावे, असा ठराव मंजूर केला होता. पण व्हीआयपी लोकांमुळे त्याला आळा घालता आला नाही. त्यानंतर त्यावर उपाय म्हणून पास सिस्टीम सुरु करण्यात आली होती. पण त्यातही घोळ होत असल्याने अखेर ट्रस्टने पास ही बंद केला आहे. 


गाभारा दर्शनासाठी शुल्क आकारण्याची मागणी देखील एका वर्गाने केली होती. असं केल्यास ट्रस्टचं उत्पन्न वाढेल आणि विकासकामं करण्यास ही आर्थिक मदत होईल. असं त्यांचं म्हणणं होतं. पण सामान्यांनी याला विरोध केला होता. त्यानंतर सरसकट सगळ्यांनाच गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्यात आले आहे.