घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा
सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : VO - वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा, ऑनलाईन व्यवसाय सुरु करा लाखो कमवा, घरबसल्या कमाई करा, असे फोन तुम्हालाही आले असतील आणि तुमच्या मनातही झटपट पैसे कमवण्याचा विचार क्लिक झाला असेल, हे करुन बघूया असं तुम्हालाही वाटलं असेल तर सावधान व्हा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) चोरीचा नवा फंडा शोधलाय. घरबसल्या पैसे देण्याचं आमिष दाखवत गुन्हेगार तुम्हाला लुटतायत. तंत्रज्ञान जसं बदललं तसं गुन्हेगारीचं स्वरुपही बदललं आहे. मुंबई पोलीसमधून (Mumbai Police) बोलतोय, कुरिअरमध्ये ड्रग्स सापडलंय, पैसे पाठवा नाहीतर कारवाई करु असे बनावट कॉल केले जातायत. पोलिसांच्याच नावे कॉल येत असल्याने सामान्य माणूस फसला जातोय.
एटीएम कार्ड बदलायचं आहे, लिंकवर क्लिक करा. वीजबील न भरल्याने वीज तोडण्यापासून वाचण्यासाठी लिंकवर दिलेल्या वेबसाईटवर माहिती भरा. क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात वाढलेत. बनावट वेबसाइट उघडून लोकांना लुबाडणं, सिमकार्ड क्लोन करून ओटीपी मिळवणं या प्रकारातही मोठी वाढ झालीय. एकट्या पुण्यात गेल्या आठ महिन्यात एक हजारपेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झालीय. यात 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आलीय.
ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणं
टास्क फ्रॉडची 209 प्रकरणे
मनी ट्रान्स्फरची 56 प्रकरणे
KYC अपडेट करा या गुन्ह्यांचे 42
क्रीप्टोकरन्सीत गुंतवणूक करुन फसवणुकीचे 58
इन्शुरन्स फसवणुकीचे 10
घरबसल्या कमाईच्या फसवणुकीचे 31
शेअर मार्केट फ्रॉडचे 27
कर्ज देणार सांगून फसवणुकीचे 29
ऑनलाईन विक्री-खरेदीत फसवणुकीच 62
फेक प्रोफाईलचे 85
फेसबुक हॅकिंगचे 34
सेक्सटॉर्शनचे 35
अशा एकूण 1 हजार 114 तक्रारी फक्त 8 महिन्यात आल्यात.
आपण फसवले गेले याची जाणीव होईपर्यंत सायबर ठग ते पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवलेले असतात. तेव्हा ते मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.. म्हणूनच सायबर गुन्हेगारीपासून सावध राहणंच गरजेचं आहे. डिस्काऊंट कूपन मिळतंय.. कॅशबॅक मिळतंय. अशा फसव्या जाहिरातींपासून दूर राहणं गरजेचं आहे. नोकरीसाठी कोणी पैसे घेत असल्यास संशय आला पाहिजे. कोणी पार्सल आल्याचा फोन केल्यावर खरंच ते आपलं पार्सल आहे का याची खातरजमा केली पाहिजे.